बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा; बालमजुरी आढळल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
गोंदिया : बालमजुरीचे समूळ उच्चाटन करून प्रत्येक बालकाला शिक्षण, सुरक्षित बालपण आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 14 नोव्हेंबर बाल दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात कामगार प्रथाविरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून बालमजुरीविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार असून बाल व किशोरवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारित अधिनियम 2016 नुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत कामावर ठेवण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे. मात्र, काही अटी व शर्तींच्या अधीन राहून कौटुंबिक व्यवसाय तसेच कला व मनोरंजन क्षेत्रात मर्यादित अपवाद देण्यात आले आहेत. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना कारखाने, खाणी, रासायनिक कामे यांसारख्या धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
या कायद्याचे उल्लंघन करून बालकांना किंवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या मालकांविरुद्ध दंडात्मक व कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालमजुरी करून घेणे हा दखलपात्र गुन्हा असून दोषी मालकास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 20 हजार ते कमाल 50 हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास एक ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
महाराष्ट्र शासनाच्या बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) (पहिली सुधारणा) नियम, 2025 नुसार 14 वर्षांखालील मुलांना ‘बाल’ आणि 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना ‘किशोरवयीन’ म्हणून परिभाषित करण्यात आले आहे. मुलांना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त किंवा सुट्टीच्या दिवशी कुटुंबाला अथवा कौटुंबिक व्यवसायात मदत करता येते. मात्र, अशा कामाचा कालावधी दिवसाला जास्तीत जास्त तीन तासांपर्यंत मर्यादित असणे आवश्यक आहे. तसेच रात्री 7 ते सकाळी 8 या वेळेत मुलांकडून काम करून घेता येणार नाही. अशा कामामुळे त्यांच्या शालेय शिक्षणावर कोणताही परिणाम होता कामा नये.
जिल्ह्यात बालमजुरी रोखण्यासाठी तसेच बालकामगारांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्स तथा दक्षता समिती कार्यरत आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायती आणि शहरी भागात महानगरपालिका व नगरपालिकांना बालमजुरी रोखणे आणि याबाबत जनजागृती करण्याची कायदेशीर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बालमजुरी आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन
गोंदिया जिल्ह्यात 14 वर्षांखालील बालकांना किंवा 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करताना आढळल्यास अथवा त्यांच्याकडून बालमजुरी करून घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तक्रार करावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्राथमिक शिक्षण विभाग, स्थानिक पोलीस ठाणे किंवा सहाय्यक कामगार आयुक्त, गोंदिया यांच्याकडे प्रत्यक्ष, टपालाद्वारे किंवा aclgnd@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदविता येईल. तसेच PENCIL Portal या ऑनलाइन पोर्टलवरही तक्रार करता येणार आहे.
बालमजुरीमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी जागरूक राहून बालमजुरीची कोणतीही घटना निदर्शनास आल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हा बालकामगार कृती दलाचे सदस्य सचिव यांनी केले आहे.








