गोंदिया ( गोरेगाव ) : नवीनगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नागझिरा कोअर सहवनक्षेत्रातील थानझरी बिटात सामूहिक गस्तीदरम्यान एक नर वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० नोव्हेंबर २०२६ रोजी ही घटना उघडकीस आली असून, प्राथमिक अंदाजानुसार वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे (करंट लागून) झाल्याचे बोलले जात आहे.
घटना कशी उघडकीस आली?
१० नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र नागझिरा (स्थित गोरेगाव) अंतर्गत नागझिरा कोअर सहवनक्षेत्रातील नियतक्षेत्र थाडेझरी बिटात कक्ष क्रमांक ९९ राखिव वन परिसरात वन कर्मचाऱ्यांची सामूहिक गस्त सुरू असताना एका नर वाघाचा मृतदेह निदर्शनास आला. ही बाब लक्षात येताच वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच, नवीनगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सौ. पियूषा जगताप, नागझिरा खंड गोंदियाचे उपसंचालक श्री. प्रीतमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक श्री. विपिन लांडगे, गोंदियाचे वनमहेंद्र भांगरे, गस्ती पथक तसेच नागझिराच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती ए. व्ही. लांबट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
समितीमार्फत पंचनामा व शवविच्छेदन
राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) कार्यपद्धतीनुसार एका विशेष समितीची स्थापना करून घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. या समितीत सावंत बहेकार (मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया), रुपेश निवारे (NTCA प्रतिनिधी, गोंदिया), इद्रीस अहमद (WTI सदस्य) आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे आणि समिती सदस्यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले. तसेच वाघाचे विसेरा सॅम्पल पुढील उत्तरदयी तपासणीकरिता संकलित करण्यात आले आहेत.
सर्व अवयव सुरक्षित; पंचमंडळींसमोर दहन
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत नर वाघ असून प्रथमदर्शनी त्याचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. तपासादरम्यान वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत व सुरक्षित असल्याचे आढळले. शवविच्छेदनानंतर नियमांनुसार पंचमंडळींसक्षम वाघाचे अंत्यसंस्कार (दहन) करण्यात आले.
पुढील तपास सुरू
सदर प्रकरणाचा पुढील तपास सौ. पियूषा जगताप (उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक) आणि श्री. प्रीतमसिंग कोडापे (उपसंचालक, नागझिरा खंड, गोंदिया) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विपिन लांडगे (सहायक वनसंरक्षक) व श्रीमती ए. व्ही. लांबट (वनपरिक्षेत्र अधिकारी, नागझिरा) करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांनी दिली आहे.








