जिल्हास्तरीय युवा महोत्सव 25 नोव्हेंबरला गोंदियात

लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, पथनाट्य व कवितालेखन स्पर्धांचे आयोजन; 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागाची संधी

            गोंदिया : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे, या उद्देशाने युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत सन 2026-27 या वर्षातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 25 नोव्हेंबर 2026 रोजी भवभुती रंग मंदिर, कन्हारटोली, गोंदिया येथे करण्यात आले आहे.
            राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यंदापासून ‘YBYLD’ (विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग) या स्वरूपात रूपांतर करण्यात आले असून, हा उपक्रम विकसित भारत @ २०४७ या संकल्पनेशी जोडण्यात आला आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीतील सहभाग वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
            सन २०२६-२७ मधील ‘विकसित भारत चॅलेंज ट्रॅक’ अंतर्गत राज्यस्तरीय राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर युवा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
            या महोत्सवामध्ये समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कवितालेखन या पाच स्पर्धात्मक कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून युवक-युवतींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची आणि विविध कलाप्रकारांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
            जिल्हास्तरीय युवा महोत्सवात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या संघ व युवा कलाकारांना त्यांच्या कामगिरीनुसार विभागस्तरावर कला सादरीकरणाची संधी मिळेल. विभागस्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या स्पर्धकांना राज्यस्तरावर, तर राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या कलाकार व संघांना राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक स्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या युवा कलाकार व संघांना शासनामार्फत रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
           या महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक व युवतींना सहभागी होता येईल. वयोमर्यादेची गणना १७ ऑगस्ट २०२६ या संदर्भ दिनांकानुसार करण्यात येणार असून, त्यानुसार स्पर्धकाचे वय १५ ते २९ वर्षे असणे आवश्यक आहे. वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला जोडणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाने ‘My Bharat Portal’ वर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
           पोर्टलवरील नोंदणीनंतर ऑफलाइन नोंदणीसाठीचा विहित नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथून प्राप्त करून घ्यावा. त्यानंतर विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज व ओळखपत्र कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धांचे नियम, प्रत्येक कलाप्रकारासाठी सहभागी कलाकारांची संख्या, कला सादरीकरणासाठी निर्धारित वेळ तसेच इतर आवश्यक अटी व शर्तींची सविस्तर माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावी.
            जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा आणि विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी साधावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!