केशोरी पोलिसांच्या तपासाला यश: प्रतापगडमधील नराधम बापाला जन्मठेप; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि विनयभंग प्रकरणात न्यायालयीन कठोर निर्णय

गोंदिया ( केशोरी ) :- स्वतःच्याच नऊ वर्षीय पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या प्रतापगड येथील नराधम आरोपीला गोंदिया न्यायालयाने दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. केशोरी पोलिसांनी केलेल्या अत्यंत कसून आणि यशस्वी तपासाच्या जोरावर हा कठोर निकाल लागला असून, या निकालामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उमेश राजू रामटेके (वय ३६, रा. प्रतापगड, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (DJ-3) यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी या दोन्ही स्वतंत्र प्रकरणांत ऐतिहासिक निकाल दिला आहे.

१. पोटच्या मुलीवर अत्याचार: जन्मठेपेची शिक्षा
केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (गुन्हा क्र. ५७/२०२५) करण्यात आला होता. आरोपी उमेश रामटेके याने स्वतःच्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच, आपल्या आईवर जबरदस्ती करून तिला व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले यांनी केला. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे वकील श्री. सतीश घोडे व श्री. चुटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरत आरोपीला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

  • भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(f): १५ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड.
  • POCSO कायदा कलम ६: जन्मठेप व ५ हजार रुपये दंड.
  • BNS कलम ३५१(३): ५ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड.

२. अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि घरात घुसखोरी
दुसऱ्या एका प्रकरणात (गुन्हा क्र. ३३/२०२४), १२ एप्रिल २०२४ च्या रात्री प्रतापगड येथे १७ वर्षे ५ महिने वयाच्या अल्पवयीन पीडितेच्या घरात अनधिकृत प्रवेश करून तिचा विनयभंग करण्यात आला होता. पीडिता झोपेत असताना आरोपीने घरात घुसून शारीरिक सुखाची मागणी केली व तिचा हात पकडला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड यांनी केला. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे वकील श्री. सतीश घोडे व श्री. चुटे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत विविध कलमांखाली पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

  • भादंवि कलम ४५० (घरात अनधिकृत प्रवेश): ५ वर्षे सश्रम कारावास.
  • भादंवि कलम ३५४ (विनयभंग): ३ वर्षे सश्रम कारावास.
  • भादंवि कलम ५०६ (धमकी): ३ वर्षे सश्रम कारावास
  • POCSO कायदा कलम ८ व १२: अनुक्रमे ३ व २ वर्षे सश्रम कारावास आणि दंड.

केशोरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
दोन्ही प्रकरणांमध्ये केशोरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत वेगाने आणि पुराव्यानिशी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी तथा महिला पोलीस शिपाई पुनम ठाकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या उल्लेखनीय तपासाबद्दल गोंदियाचे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेश तटकरे आणि केशोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन ढेकणे यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन व कौतुक केले आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांत आरोपीला शिक्षा झाल्यामुळे पीडितांना न्याय मिळाला असून नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे स्वागत होत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!