गोंदिया ( देवरी ) शिरपूरबांध : देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत शिरपूरबांध अंतर्गत येणाऱ्या वऱ्हाडघाट येथे वाघाने एका गायीची शिकार केल्याची घटना शनिवारी (दि. १७) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसर व आसपासच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावलागत असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक ५६४ मधील चांदिटोला ते व्हाडघाट रस्त्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही घटना घडली. व्हाडघाट येथील रहिवासी राखडू दामू कोराम यांच्या मालकीच्या गायीवर वाघाने (वाघीण) हल्ला करून तिला ठार केले.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी आणि शेतमजूर कामासाठी दररोज शेतात जात आहेत. गावलागतच वाघाचा वावर वाढल्याने शेतात काम कसे करावे आणि स्वतःचा जीव कसा सुरक्षित ठेवावा, असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर निर्माण झाला आहे.
कॅमेऱ्यात कैद झाली वाघीण; वन विभाग अलर्ट मोडवर
घटनेची माहिती मिळताच वन विभागाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. गायीची शिकार झालेल्या परिसरात वन विभागामार्फत ट्रॅप कॅमेरे (Cuddeback Camera) लावण्यात आले. या कॅमेऱ्यात शिकार खाताना वाघीण स्पष्टपणे कैद झाली आहे. वन विभागाने वाघाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तात्काळ बंदोबस्ताची मागणी
या हिंस्त्र वन्यजीवाच्या वावरामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुरे चरण्यासाठी नेणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वन विभागाने तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.









