महसूल विभागाचा वेळकाढूपणा! ताडगावातील ४ हजार ब्रास अवैध रेती प्रकरण दोन महिने प्रलंबित

ताडगावात अग्रवाल ग्लोबल कंपनीकडून ३ ते ४ हजार ब्रास रेतीचा अवैध साठा, तहसीलदारांनी ५८ दिवसांनी हलवली फाईल

गोंदिया ( अर्जुनी-मोरगाव ) : अर्जुनी-मोरगाव ते लाखांदूर रस्ता बांधकामात वापरण्यासाठी मौजा ताडगाव येथे ३ ते ४ हजार ब्रास अवैध रेतीचा साठा केल्याप्रकरणी तहसील प्रशासनाने तब्बल ५८ दिवस उलटूनही जप्तीची कारवाई केली नाही. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमापाचा अहवाल मागवून वेळ मारून नेण्याचा प्रकार समोर आल्याने महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथील तक्रारदार मोहसीन अन्सारी यांनी दि. २० जुलै २०२६ रोजी तहसीलदार अर्जुनी-मोरगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. ही तक्रार कार्यालयात दि. २२ जुलै रोजी प्राप्त झाली. तक्रारीत म्हटले होते की, अग्रवाल ग्लोबल कंपनीने अर्जुनी-मोरगाव ते लाखांदूर रस्त्याच्या कामासाठी मौजा ताडगाव येथील आपल्या प्लांट परिसरात सुमारे ३ ते ४ हजार ब्रास अवैध रेतीचा बेकायदेशीर साठा केला आहे. त्याचा फोटोसह पंचनामा करून कारवाई करावी.

या तक्रारीनंतर महसूल विभागाने कारवाई करण्याऐवजी तब्बल २२ दिवसांनी मौका पंचनामा केला. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केलेला हा पंचनामा दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी तहसील कार्यालयात जमा झाला. या पंचनाम्यात रेती साठा असल्याचे स्पष्ट झाले.

धक्कादायक बाब म्हणजे पंचनामा सिद्ध होऊनही दि. १३ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर म्हणजे ३४ दिवस तहसीलदार कार्यालयाने फाईल दाबून ठेवली. कोणतीही जप्ती न करता अखेर दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी पत्र क्र. /म.स/गौण खनिज/कावि/७८८/२०२६ अन्वये उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अर्जुनी-मोरगाव यांना पत्र लिहिले.

या पत्रात म्हटले आहे की, मौजा ताडगाव येथे साठवणूक असलेल्या रेतीचे ब्रास मध्ये मोजमाप करून परिणाम अहवाल तात्काळ सादर करावा, जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सोईचे होईल.

२० जुलैची तक्रार आणि १६ सप्टेंबरचे पत्र यामध्ये ५८ दिवसांचा कालावधी गेला आहे. या काळात संबंधित कंपनीने रेतीचा वापर करून पुरावा नष्ट केल्याची चर्चा आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग अहवाल कधी देतो आणि प्रशासन कारवाई करते का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!