गोंदिया : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पात्र मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी व विशेष सवलतींची तरतूद करण्यात आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत पार पडेल, तर मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ आणि सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ च्या शासन निर्णयानुसार, पदवीधर मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांच्या नियमित नैमित्तिक रजेव्यतिरिक्त (Casual Leave) अतिरिक्त असणार आहे.
खाजगी कर्मचाऱ्यांना २ तासांची सवलत
खाजगी आस्थापना, कंपन्या व कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू नसल्यामुळे, त्यांना मतदानासाठी कामाच्या वेळेत २ तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश नागपूरच्या विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित आस्थापनांना देण्यात आले आहेत.
“नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा.”
— मंदार पत्की (जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया)








