नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे बीएलओ घरी येऊन घेणार; व्हॉट्सॲपद्वारेही पुरावे सादर करण्याची सुविधा

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी प्रत्यक्ष सुनावणीची आवश्यकता नाही
गोंदिया : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत जुळवणी न झालेल्या (No Mapping) किंवा तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळलेल्या मतदारांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांना बजावण्यात आलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे व पुरावे जमा करून घेतील. तसेच, संबंधित मतदारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही कागदपत्रे सादर करता येणार आहेत.
            भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या २६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार तसेच २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशांनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, त्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित बीएलओ (BLO) यांच्याकडे उपलब्ध करून द्यावीत. प्राप्त कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी पुढील निर्णय घेतील.
           तार्किक विसंगती असलेल्या प्रकरणांमध्ये केवळ संबंधित विसंगतीशी निगडित कागदपत्रे विचारात घेतली जातील. तसेच, बीएलओ यांच्या पडताळणी अहवालाच्या किंवा पंचनाम्याच्या आधारेही निर्णय घेण्यात येईल. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसल्यास, अशा अपवादात्मक प्रकरणांमध्ये संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतील. या सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते.
         विशेष शिबिरांतही कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
           मतदार नोंदणीसाठी ३, ४, १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय विशेष शिबिरांमध्येही नोटीस प्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
           बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी समाजातील नागरिक, विशेषतः अतिसंवेदनशील आदिवासी समूहातील (PVTG) व्यक्ती तसेच अनाथ आणि इतर असुरक्षित गटांतील मतदारांसाठी विशेष शिबिरे व मदत कक्ष आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माध्यमातून अशा घटकांतील पात्र मतदारांना आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
          पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता
           मतदार याद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार, मतदार यादीत समावेश होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक पुरावे उपलब्ध नसलेल्या किंवा प्राप्त कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेशी संधी दिली जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार सुनावणी घेऊन नियमानुसार आदेश पारित करण्यात येतील.
           मतदारांशी संपर्क साधणे आणि त्यांच्याकडून कागदपत्रे जमा करून घेण्याच्या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींशी समन्वय ठेवणार आहेत.
           ६५-गोंदिया विधानसभा मतदारसंघातील संबंधित मतदारांनी कागदपत्रे जमा करण्यासाठी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रभान खंडाईत, मतदार नोंदणी अधिकारी, ६५-गोंदिया विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!