सिरपुर देवरी तपासणी नाक्यावर नेमलेले फंटर नेहमीच ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गोंदिया ( देवरी ) ; महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात स्थित सिरपुर देवरी सीमा तपासणी नाक्यावर कागदपत्र तपासणीच्या नावाखाली ट्रक चालकांकडून अतिरिक्त वसुली होत असून ही देवाण- घेवाणाची प्रक्रिया वाहतूक कोंडी होण्यास जबाबदार ठरत आहे. देवरी तालुक्यातील सिरपुर येथील सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्यांच्या नेमलेल्या फंटराकडून एन्ट्रीच्या नावाने पैसे उकळले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. याबाबतची एक चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या चित्रफितीत दर्शवल्याप्रमाणे काही फंटर वाहनाची कागदपत्र जमा करण्यासाठी या तपासणी नाक्यावर नेहमीच ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सीरपुर सीमा तपासणी नाक्यावर वाहनांचे वजन आणि कागदपत्र तपासले जातात. वजन काट्यावरून गाडी पुढे आल्यावर येथे काही फंटर उभे राहत असून हे फंटर वाहनांची कागदपत्रे घेऊन ती कार्यालयात जमा करतात. पुढे वाहन चालक आपले वाहन बाजूला उभे करून आपली कागदपत्रे घेण्यासाठी गेल्यास तिथे चालकांकडून वाहनांच्या चाकांच्या संख्येनुसार 200 ते 500 रुपये घेतले जातात. या पैशाची कोणत्याही प्रकारची पावती न देता पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
त्याच बरोबर एखादे वाहन आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन प्रवास करताना आढळल्यास त्याच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई न करता काही ठराविक रक्कम घेऊन वाहन सोडण्याचे प्रकार करण्यासाठी इतर काही दलाल मंडळी या तपासणी नाक्याजवळ हिंडत फिरत असतात असा आरोप देखील करण्यात येत आहे. त्यामुळे सिरपुर तपासणी नाका हा अधिकारी, कर्मचारी व तळीरामांसाठी पैशाचे कुरण ठरले आहे. या संदर्भात परिवहन विभागाचे संबधीत अधिकारी यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केले असता संपर्क होऊ सकला नाही. तसेच मालवाहू वाहनांकडून अतिरिक्त पैशाची मागणी केल्यास कार्यालयात तक्रार करण्याची सुविधा असल्याचे वरिष्ट अधिकार्यांकडुन निदर्शनास आणून दिले जाते. मात्र समाज माध्यमांवरील चित्रफितीबाबत तसेच घडणार्या प्रकाराबाबत अधिक भाष्य करण्याचे अधिकार्यांकडुन टाळले जाते.









