बारामतीहून आलेल्या अस्थी कलशाचे हजारो नागरिकांनी घेतले दर्शन
गोंदिया : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने आपल्या लाडक्या नेत्याच्या पावन स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या अस्थींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आज संपूर्ण गोंदिया जिल्हा भावूक झाला होता. बारामती येथून विशेष सन्मानाने आणण्यात आलेला त्यांचा पवित्र अस्थी कलश आज गोंदिया नगरीत दाखल झाला, तेव्हा हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या ‘दादां’ना साश्रू नयनांनी अभिवादन केले.
स्व. अजित पवार यांचा अस्थी कलश आज सकाळी १०:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला. बारामतीवरून कलशाचे आगमन होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक, शेतकरी, महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
अजित दादांचे गोंदिया जिल्ह्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात अत्यंत शोकाकुल वातावरणात हा दर्शन सोहळा पार पडला. अनेकांना आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले होते. शिस्तप्रिय आणि कामाचा झपाटा असलेल्या या नेत्याच्या जाण्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, आमदार राजकुमार बडोले व उपस्थित मान्यवर यांनी यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्व. अजित दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांनी आखून दिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या अस्थी कलश दर्शन सोहळ्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्हा आज आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणीत हरवून गेला होता.








