गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘महाशिवरात्री’ निमित्ताने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दरम्यान ख्वाजा गणी हारुनी उर्सचे आयोजन सुध्दा होणार आहे. प्रतापगड यात्रेत विविध जिल्ह्यातून व शेजारच्या राज्यातून अंदाजे 5 ते 6 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एकेरी वाहतुकीचा अवलंब करणे आवश्यक असल्याने, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 व गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या शासकीय अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील प्रतापगड येथील ‘महाशिवरात्री’ निमित्ताने होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून ते 20 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजेपर्यंत खालील मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहे.
प्रतापगड यात्रेकरीता येणारी सर्व वाहने सुकळी फाटा मार्गे प्रतापगड देवस्थानकडे येतील. प्रतापगड यात्रेतून बाहेर जाणारी सर्व वाहने ही गोठणगाव मार्गे नवेगावबांध कडे बाहेर पडतील. सदर आदेशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया यांनी पोलीस स्टेशन केशोरी, अर्जुनी मोरगाव प्रभारी अधिकारी यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी सूचनात्मक वाहतूक चिन्हे व बोर्ड लावून घ्यावेत. सदर आदेश 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून ते 20 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.









