नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दुर्दैवी घटना – विहिरीत पडून वाघाचा मृत्यू

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरोडा वनपरिक्षेत्रातील कोडेलोहारा परिसरात एका वाघाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक 264 मधील एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून अंदाजे 4 ते 5 वर्ष वयाच्या वाघाचा मृत्यू झाला. ही घटना 11 एप्रिल 2026 रोजी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे जलद बचाव पथक (RRT) आणि भंडारा वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विजय धांडे, मनिषा चव्हाण, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत आणि इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
प्राथमिक अंदाजानुसार, वाघ हा शिकारीच्या मागावर असताना अचानक कठडे नसलेल्या विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा.
दरम्यान, गोंदिया जिल्हाधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदनासाठी NTCA चे प्रतिनिधी, वन्यजीव रक्षक आणि पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक मनिषा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, वनविभागाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतातील उघड्या विहिरींना कठडे बांधण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें