
गोंदिया : बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारीत अधिनियम-2016 अन्वये पुढीलप्रमाणे तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. 14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रुपये व कमाल 50 हजार रुपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल.
गोंदिया जिल्ह्यात वरील वयोगटाचे बालक/किशोरवयीन बालक धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करीत असल्याचे किंवा अशाप्रकारचे व्यवसायांमध्ये बालकामगार कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग किंवा पंचायत समिती, स्थानिक पोलीस स्टेशन, सहायक कामगार आयुक्त गोंदिया यांचेकडे प्रत्यक्षात, पोष्टाव्दारे किंवा aclgnd@gmail.com या ई-मेलव्दारे तसेच PENCIL PORTAL व्दारे ऑनलाईन स्वरुपात तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा बालकामगार कृती दल गोंदियाव्दारे करण्यात आले आहे.








