वन विभागाचा मोठा निर्णय; पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग सेवा पुन्हा सुरू
गोंदिया : वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गोंदिया जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ‘नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील’ (NNTR) निसर्ग पर्यटन आणि सफारीची मुदत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभागाने जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार, आता हा व्याघ्र प्रकल्प १५ जून ऐवजी आगामी ३० जून २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला राहणार आहे. वन विभागाने पर्यटकांसाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षण प्रणाली देखील पुन्हा सक्रिय केली आहे.
मान्सून लांबल्याने आणि रस्ते सुरक्षित असल्याने निर्णय
दरवर्षी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशानुसार पावसाळ्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत संरक्षित क्षेत्रातील पर्यटन बंद ठेवण्यात येते. त्यानुसार यावर्षीही वरिष्ठ कार्यालयाकडून तसे आदेश जारी करण्यात आले होते.
परंतु, सध्याची परिस्थिती पाहता या भागात पावसाचा जोर अत्यंत कमी आहे. यासोबतच जंगलातील अंतर्गत पर्यटन मार्ग आणि रस्ते पूर्णपणे सुरक्षित आणि सुव्यवस्थित आहेत. पर्यटकांचा वाढता ओघ आणि सुरक्षित रस्ते लक्षात घेता, वरिष्ठ वन कार्यालयाने पूर्व आदेशात बदल करून पर्यटनाची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोअर एरियाचे सर्व गेट्स राहणार सुरू
या सुधारित आदेशानुसार, व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील (Core Area) सर्व पर्यटन प्रवेश द्वार (Gates) आणि पर्यटन संकुल (Complex) ३० जूनपर्यंत नियमितपणे सुरू राहतील.
अशी करा ऑनलाईन बुकिंग:
जे पर्यटक किंवा वन्यजीव प्रेमी या वाढीव १५ दिवसांच्या कालावधीत सफारीचा आनंद घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी वन विभागाने www.safaribooking.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंगची सेवा उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक कार्यालय, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले आहे.








