बांधकाम कामगारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये

गोंदिया : कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण करण्यात येऊन त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात. नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अर्ज निकाली काढले जातात. अर्ज मंजूर/नामंजूर एस.एम.एस. (SMS) द्वारे कारणासह कामगारांना कळविल्या जाते. सदर सेवा मंडळामार्फत निःशुल्क राबविण्यात येतात.
           बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात देण्यात येत असून, याकरीता कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. ही सर्व कामे ऑनलाईन असून ते कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाही. या ऑनलाईन कामाकरीता कोणीही पैशाची/कमिशनची लाचेची मागणी केल्यास मंडळाच्या जिल्हा कार्यालयास किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करावी, अशा प्रकारच्या सूचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र व तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आलेल्या आहेत.
           नोंदणी, नुतनीकरण व लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यावर कामगारास त्याने निवडलेल्या तारखेस कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येते. लाभाच्या अर्जासंदर्भातील उपस्थित राहण्याबाबतच्या पत्रात देखील मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून, कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निःशुल्क क्रमांक १०६४ अथवा ई-मेल acbwebmail@mahapolice.gov.in वर तक्रार नोंदवावी असे नमुद केलेले आहे. त्यामुळे कामगारांनी कोणत्याही आमिषास बळी पडू नये.
           बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या कामगारांनीच नोंदणी करण्याचे नियोक्ता/ठेकेदार यांनी त्यांचेकडे काम करीत असलेल्या व नोंदणीसाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांनाच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे, तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किंवा महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांनाच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमीत करावेत, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांनी केले आहे.
                                            

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें