विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होणार; उर्वरित महाराष्ट्रात आजपासूनच घंटा वाजणार!

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय; कडक उन्हाळ्यामुळे विदर्भाला दिलासा
महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने आज एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, विदर्भातील तीव्र तापमान आणि कडक उन्हाळा विचारात घेता तेथील शाळा आता सोमवार, दिनांक ३० जून २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होणार आहेत. तर, विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सर्व शाळा पूर्वघोषित वेळापत्रकानुसार आज म्हणजेच सोमवार, दिनांक १५ जून २०२६ पासून नेहमीच्या वेळेत सुरू झाल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निर्णय
विदर्भातील वाढते तापमान आणि उष्णतेची लाट लक्षात घेता, ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, पुणे व इतर’ विरुद्ध ‘महाराष्ट्र शासन’ यांच्यात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर (Writ Petition No. ४०६७/२०२६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० जून २०२६ रोजी महत्त्वाचा निर्णय दिला होता. या निर्णयाचा आधार घेऊन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी संयुक्त स्वाक्षरीने हे नवे निर्देश जारी केले आहेत.
संभ्रम दूर; विदर्भाला १५ दिवसांची मुदतवाढ
यापूर्वी शिक्षण संचालनालयाने वेगवेगळ्या परिपत्रकांनुसार शाळा १५ जून आणि २२ जूनपासून सुरू करण्याचे कळवले होते, ज्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, ताज्या आदेशानुसार विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढत्या उन्हामुळे थेट ३० जूनपर्यंत दिलासा मिळाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोणताही बदल न करता आजपासूनच शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश
शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) आणि बृहन्मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या आदेशाची तात्काळ व कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला असून, पालकांनीही न्यायालयाच्या आणि प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें