दुध भेसळ करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई-अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे

गोंदिया : जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांची आता गय नाही. अस्वच्छता आणि त्रुटी आढळल्यास थेट फौजदारी कारवाई होणार. धडक मोहिमेपूर्वी सर्व दूध व्यावसायिक, डेअरी आणि हॉटेल चालकांचे होणार समुपदेशन. त्यानंतर दुध भेसळ करण्यांवर होणार कठोर कारवाई, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिले.
            गोंदिया जिल्ह्यातील जनतेला स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा व्हावा आणि दूध भेसळीला पूर्णपणे आळा बसावा, यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील दूध उत्पादक, पुरवठादार, डेअरी व्यावसायिक आणि हॉटेल चालकांना कडक इशारा देण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा आणि दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले.
           बाजारातील बनावट दूध आणि भेसळीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाही, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, अशा भेसळयुक्त आणि अस्वच्छ दुधामुळे गोंदियातील जनतेच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर अत्यंत विपरीत आणि घातक परिणाम होत आहे. त्यादृष्टीने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतलेले मुख्य निर्णय आणि निर्देश पुढीलप्रमाणे आहेत.
          खरेदी-विक्रीच्या नोंदी अनिवार्य : जिल्ह्यातील सर्व खाजगी दूध संकलन केंद्रे आणि दुग्धजन्य पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या आस्थापनांनी दररोजच्या व्यवहाराच्या अधिकृत नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. अन्न सुरक्षा परवान्याच्या (FSSAI) अटींनुसार नोंदी न आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
           सर्व दूध डेअरी, संकलन केंद्रे, हॉटेल्स आणि निर्मिती केंद्रांवर अन्न सुरक्षा कायद्याच्या ‘अनुसूची 4’ नुसार स्वच्छता राखणे बंधनकारक आहे. तपासणीत अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश समीतीस देण्यात आले.
           पोलीस विभागामार्फत गोपनीय माहिती संकलन : जिल्ह्यातील अवैध दूध भेसळ करणारे मुख्य हॉटस्पॉट शोधून काढण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या. पोलीस यंत्रणेमार्फत आता दुग्धजन्य पदार्थाची भेसळ बाबत गोपनीय माहिती गोळा केली जात आहे.
           कारवाईपूर्वी एकदा होणार समुपदेशन; त्यानंतर थेट धडक मोहीम : अपर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात थेट गुन्हे दाखल करण्यापूर्वी मानवी दृष्टिकोन ठेवून सर्व संबंधित घटकांना सुधारण्याची एक संधी दिली जाईल. यासाठी सर्व दूध उत्पादक पुरवठादार, दुग्धजन्य पदार्थ निर्माते, डेअरी मालक आणि हॉटेलचालक यांच्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समुपदेशन बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत सर्वांना कायद्याचे नियम समजावून सांगितले जातील.
            या समुपदेशन बैठकीनंतर, कोणतीही पूर्वकल्पना न देता संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सर्व विभागांच्या संयुक्त समन्वयाने व्यापक धडक तपासणी मोहीम सुरू केली जाईल. त्या मोहिमेत दोषी आढळणाऱ्यांवर थेट फौजदारी खटले दाखल केले जातील.
           बैठकीला शासकीय दूध योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापक प्रशांत बोरसे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर व वैधमापन शास्त्र विभागाचे प्रतिनिधी संजय कांबळे उपस्थित होते.
                                                 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें