गोंदिया तालुक्यात २८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; प्रशासनाची जय्यत तयारी

गोंदिया :  तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात येत्या २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील एकाही बालकाला लसीकरणापासून वंचित राहू न देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

या मोहिमेत गोंदिया तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे २१७ लसीकरण बूथ तर शहरी भागात ८३ बूथ उभारण्यात येणार असून एकूण सुमारे ३०० बूथ कार्यरत राहतील.

लसीकरणासाठी ट्रान्झिट व मोबाईल टीम्स देखील तैनात करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात १४ व शहरी भागात १० अशा एकूण २४ ट्रान्झिट टीम्स कार्यरत राहतील. तसेच १० मोबाईल टीम्सद्वारे दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे.

या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण भागात सुमारे ६५६ कर्मचारी तर शहरी भागात ३०५ कर्मचारी काम करणार आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा व नर्सिंग विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.

लसीकरणानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस घर ते घर भेटी देऊन (हाऊस-टू-हाऊस) लसीकरण पूर्ण केले जाईल. जे बालक पहिल्या दिवशी बूथवर येऊ शकणार नाहीत, त्यांना घरी भेट देऊन लस दिली जाईल.

तसेच विटभट्ट्या, बांधकाम साईट, स्थलांतरित मजूर व दुर्गम वस्त्यांमधील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मोहिमेसाठी आवश्यक लसी, मार्कर पेन, प्रिंटिंग साहित्य व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गोंदिया तालुक्यातील या मोहिमेत एकूण ३५ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस देऊन मोहिम यशस्वी करावी.

दरम्यान, भारताने २०१४ मध्ये पोलिओमुक्त दर्जा मिळवला असला तरी शेजारील देशांमध्ये अद्याप पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें