गोंदिया : गोंदिया शहरात अवैध अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. गट्टाटोली परिसरातील ओव्हरब्रिजखाली अवैधपणे गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्याकडून २.०५ किलो गांजा आणि मोबाईलसह २ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाचे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ३१ जुलै २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
गस्तीदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, गांधी वॉर्ड, गोंदिया येथील रहिवासी मनिष दीपक रामटेके (वय २७ वर्षे) हा गट्टाटोली परिसरात अवैधपणे गांजा विक्रीसाठी फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गट्टाटोली ओव्हरब्रिजखाली धाड टाकली.
तेथे संशयित मनिष रामटेके हा बसलेला आढळला. पंचांसमक्ष त्याची अंगझडती आणि त्याच्याकडील दोन टीनाच्या पेटींची पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर गांजा (शेंडे व बोंडे मिश्रित) आढळला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २ लाख ५०० रुपये किमतीचा २.०५ किलो गांजा, १० हजार रुपयांचा एक अँड्रॉइड मोबाईल आणि ३०० रुपयांच्या टीनाच्या पेट्या असा एकूण २,१०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी आरोपी मनिष रामटेके याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अभिषेक जंगमवार, सफौ राजु मिश्रा, पोहवा महेश मेहर, पोहवा सुजित हलमारे, पोहवा संजय चव्हाण, पो.हवा. प्रकाश गायधने, पोहवा सुबोध बिसेन, पोशि छगन विठ्ठले आणि चापोशि राम खंडारे यांनी केली.









