गोंदिया ( चिचगढ़/देवरी ) : देवरी तालुक्यातील महाका येथे ५ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेबार वाजेच्या सुमारास एका ६५ वर्षीय वृद्धाची लाकडी काठीने डोक्यात गंभीर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होतीलाल बळीराम बडोले (वय सुमारे ६५, रा. महाका/उचेपूर) असे मृत वृद्धाचे नाव असून, या प्रकरणी चिचगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी तक्रारदार नितेशकुमार होतीलाल बडोले हे आपल्या पायांच्या ऑपरेशनच्या संदर्भाने गोंदिया येथे गेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास महाका येथील पोलिस पाटील निरज मुलेटी यांनी नितेशकुमार यांना फोनवरून माहिती दिली की, त्यांच्या वडिलांना गावातील छोटू नंदलाल बंजार (वय २५, रा. महाका) याने मारहाण केली असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत.
घटनेची माहिती मिळताच नितेशकुमार यांनी तत्काळ महाका येथील राहत्या घरी धाव घेतली. तेथे पोहोचले असता घरासमोरील छपरीमध्ये होतीलाल बडोले हे उबड्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ते दुपारी ११.३० ते १२.१५ वाजताच्या दरम्यान छपरीमध्ये जेवण करत असताना, आरोपी छोटू बंजार याने अचानक लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर जबर वार करून त्यांना जागीच ठार केले.
घटनेची माहिती मिळताच चिचगड पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, चिचगड येथे उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टमासाठी) पाठवला.
या प्रकरणी मृतकाच्या मुलाने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून चिचगड पोलिस ठाण्यात आरोपी छोटू बंजार याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.








