गोंदिया : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लिप्त असलेल्या एका अट्टल चोराला जेरबंद करण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. अटकेतील आरोपीकडून गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ६ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून त्याच्याकडून १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवीण डेकाटे (वय ३०, रा. टिळक वार्ड, मोहाडी, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील रहिवासी केशव प्रकाश शेंडे यांच्या घरातील कपाटाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५(ए), ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. तपासादरम्यान ५ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर घरफोडी मोहाडी येथील प्रवीण डेकाटे याने केल्याचे समोर आले. पोलीस पथकाने तात्काळ हालचाली करत नागपूर येथून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने अर्जुनी मोरगाव (बोंडगावदेवी), साकोली (सानगडी) आणि लाखनी (हेलोटी) येथील प्रत्येकी एक अशा एकूण ३ घरफोड्या, देसाईगंज (वडसा) येथून १ मोटारसायकल चोरी तसेच रामनगर (जि. चंद्रपूर) हद्दीत २ घरफोडीचे प्रयत्न केल्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल:
• रोख रक्कम: ₹२८,०००/-
• १ रिअलमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (किंमत ₹२५,०००/-)
• १ होंडा सीबी शाईन मोटारसायकल (किंमत ₹६५,०००/-)
•• एकूण जप्त ऐवज: ₹१,१८,०००/-
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अमरदीप खाडे, देविदास ठमके व पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी अर्जुनी मोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.








