गोंदिया ( देवरी ) : गावात बेकायदेशीरपणे हातात उघडी तलवार घेऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका इसमाला देवरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ चे कलम ३७(१) अन्वये जारी करण्यात आलेला शस्त्रबंदीचा मनाई आदेश अमलात असताना आरोपी प्रीतम सिंग प्रेमसिंग सोमवंशी (वय ४२ वर्ष, रा. भागी, ता. देवरी, जि. गोंदिया) हा विना परवाना बेकायदेशीररीत्या धारदार तलवार बाळगून गावात फिरत होता आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
संध्याकाळी ६.०० ते ७.०० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलीस हवालदार ग्याणिराम करंजेकर (बिल्ला नं. १८१३) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून देवरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रात्री २०.५० वाजता या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर यशस्वी कारवाई देवरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. करंजेकर, पो.ना. रामराव कांदे, पो.ना. इंदिवर पंधरे आणि पो.शि. कमलकिशोर चव्हाण यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा विश्वास सोडला असून गावात शांतता प्रस्थापित झाली आहे.









