विशेष बातमी
गोंदिया ( देवरी ) : एकीकडे राज्य सरकार महिला व बाल कल्याणाच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना, दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये मात्र भीषण आणि संतापजनक वास्तव समोर येत आहे. दररोज शेकडो लहान मुलांना लसीकरणासाठी आणि आहारासाठी अंगणवाडीत आणले जाते, मात्र या लहानग्यांच्या नशिबी ना बसण्यासाठी बाकडे आहेत, ना विजेची सोय! अंगणवाडीचा उघडा दरवाजा हीच एकमेव प्रकाशाची सोय असून, अंधाऱ्या खोलीतच चिमुकल्यांचे लसीकरण उरकले जात आहे.
कुजलेला डाळ-तांदूळ आणि निकृष्ट खिचडी!
अंगणवाडीतून गर्भवती महिला, स्तनदा माता आणि चिमुकल्यांना वाटप करण्यात येणारा आहार इतक्या अत्यंत खालच्या दर्जाचा आहे की, तो जनावरांच्याही खाण्याच्या लायकीचा नाही. डाळ, तांदूळ आणि खिचडीच्या नावाखाली अक्षरशः कचरा बालकांच्या पोटात ढकलला जात आहे. कुपोषण मुक्तीचा डांगोरा पिटणाऱ्या प्रशासनाला हा निकृष्ट आहार दिसत नाही का? असा उद्विग्न सवाल आता नागरिक विचारत आहेत.
‘मजबूत सरकार’ सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर मूग गिळून!
राज्यात एवढे ‘मजबूत’ आणि ताकदवान सरकार सत्तेत असताना देवरीसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील चिमुकल्यांचे हाल सुटलेले नाहीत. जर एवढ्या मोठ्या राजकीय नेतृत्वातही अंगणवाड्यांची ही गरिबी दूर होऊ शकत नसेल, तर सर्वसामान्य जनतेने आता नक्की कोणाकडून अपेक्षा ठेवायची? असा थेट प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
आम्ही तरी काय करणार? – अंगणवाडी सेविकांचा उद्वेग
या संपूर्ण व्यवस्थेवर अंगणवाडी सेविकांनीही उद्वेग व्यक्त केला आहे. “आम्हाला वरच्या पातळीवरून (वरिष्ठ स्तरावरून) जो माल पुरवला जातो, तोच आम्हाला वाटावा लागतो. यात आमचा काहीही दोष नाही. आम्ही वारंवार शासनाकडे मूलभूत सुविधा आणि चांगल्या अन्नाची मागणी करत आहोत, पण सरकार आमचे ऐकायला तयारच नाही,” असा थेट आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
आंदोलनाचा इशारा
सरकार केवळ घोषणाबाजीत मस्त असून, तळागाळातील चिमुकल्यांचे आणि मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने आणि सरकारने देवरी तालुक्यातील अंगणवाड्यांची दुरवस्था त्वरित दूर केली नाही आणि चांगल्या दर्जाचा आहार उपलब्ध करून दिला नाही, तर स्थानिक नागरिक आणि महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा आता जनतेतून दिला जात आहे.








