अहेरी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक ३ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात; १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक!

गडचिरोली ( अहेरी ) : नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामाचे बिल निघाल्यानंतर, ‘सदर काम माझ्या कोट्यातून मंजूर करून आणले’ असा दावा करत १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अहेरी नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाला १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) गोंदियाच्या पथकाने गुरुवारी (१५ ऑक्टोबर) रंगेहात पकडले. भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल विलासराव गुडेलीवार (वय ४० वर्षे), रा. प्रभाक क्र. ९, अहेरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नगरसेवकाचे नाव आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
तक्रारदार (वय ३३ वर्षे) हे इलेक्ट्रिकल ठेकेदारीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला सन २०२५-२६ च्या नगरोत्थान योजनेअंतर्गत अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. १ ते १० (रक्कम रु. ९,९३,९०९/-) आणि प्रभाग क्र. ११ ते १७ (रक्कम रु. ९,९३,८५६/-) अशा एकूण १९,८७,७६५ रुपयांच्या अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याचे काम मिळाले होते.
सदर दोन्ही कामे विहित मुदतीत पूर्ण झाल्यानंतर त्याचे संपूर्ण बिल मंजूर झाले. बिल निघाल्यानंतर आरोपी स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेलीवार याने तक्रारदाराच्या दुकानात जाऊन, “ही कामे मी जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली येथून माझ्या कोट्यातून मंजूर करून आणली आहेत,” असे सांगून एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ३ लाख रुपयांच्या लाचेची वारंवार मागणी केली.
तक्रारदाराने नाईलाजाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला ३०,००० रुपये रोख दिले होते. मात्र, आरोपीने उर्वरित २,७०,००० रुपयांसाठी व्हॉट्सॲप कॉलवरून तगादा लावल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदवली.
पडताळणी आणि रंगेहात कारवाई
प्राप्त तक्रारीवरून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचांसमक्ष आरोपीच्या अहेरी येथील हार्डवेअर दुकानात लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यादरम्यान आरोपीने उर्वरित २,७०,००० रुपयांपैकी सध्या उपलब्ध असलेली १,२०,००० रुपयांची लाच रक्कम तात्काळ आणून देण्यास सांगितले.
त्यानंतर रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून १,२०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने आरोपी अमोल गुडेलीवार याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक व मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविसकर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्रत्यक्ष सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी व पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, पोलीस अंमलदार संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे आणि दीपक बाटबर्वे यांनी केली.
नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!