गोंदियात ऐन दिवाळीत बालविवाह दणक्यात रोखला; प्रशासनाची मोठी कारवाई!

गोंदिया : दिवाळीच्या आनंदोत्सवाचा सण एका बाजूला सुरू असतानाच, गोंदिया शहरात प्रशासनाने अत्यंत सतर्कता दाखवून एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह ऐन वेळी रोखण्यात यश मिळवले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे.

अशी मिळाली गोपनीय माहिती:
दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रगती कॉलनी, छोटा गोंदिया येथे एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दामिनी पथक, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, आणि चाइल्ड हेल्पलाइनची विशेष संयुक्त टीम तयार करण्यात आली.

जन्माचा दाखला ठरला निर्णायक:
टीमने तातडीने हालचाली करत संबंधित बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडून मिळवले. या प्रमाणपत्राची पडताळणी केली असता, बालिकेचे वय अवघे १७ वर्षे, ७ महिने आणि २० दिवस असल्याचे समोर आले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असल्याने, हा विवाह कायद्याने बेकायदेशीर होता.

दुपारी धाड, लग्नाची तयारी पूर्ण:
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण टीमने दुपारी २:३० वाजता गोंदिया येथील विवाह स्थळावर धडक दिली. सायंकाळी ५:३० वाजता हा विवाह सोहळा पार पडणार होता आणि त्यासाठी लग्नाची संपूर्ण तयारी देखील झाली होती. काही वेळातच वरात निघणार आणि लग्न लागणार अशा वातावरणात पथकाने प्रत्यक्ष धडक दिली.

पालकांचे प्रबोधन आणि हमीपत्र:
दामिनी पथकातील महिला पोलिसांनी आणि बालविकास विभागाच्या टीमने नवरदेव, नवरी, त्यांचे आई-वडील व उपस्थित नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ ची माहिती दिली. बालविवाह केल्यास होणारे कायदेशीर दुष्परिणाम आणि मुलीच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांची जाणीव त्यांना करून देण्यात आली. त्यानंतर, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणार नाही, असे कायदेशीर हमीपत्र पालकांकडून आणि नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले.

तसेच, बालिकेला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी माननीय बालकल्याण समिती, गोंदिया यांच्याकडे सादर करण्यात आले

बालविवाह मुक्त गोंदिया’चा संकल्प:
‘बालविवाह मुक्त भारत, बालविवाह मुक्त महाराष्ट्र आणि गोंदिया जिल्हा’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना आवाहन करण्यात आले की, कुठेही अशा प्रकारे बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ अंगणवाडी सेविका, जवळचे पोलीस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

कारवाईत यांचा होता सहभाग:
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. यामध्ये इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अमित बेलेकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे धर्मेंद्र भेलावे, दामिनी पथकाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा निकम, सहा. फौजदार राधेश्याम फुंडे, मपोशि वैशाली भांदक्कर, चामपोशि सुरेखा मेढें, तसेच चाइल्डलाईनचे आनंद रामटेके, पूजा अनकर आणि हर्ष चव्हाण यांनी सहभाग घेतला होता.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!