गोंदिया : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अव्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नागर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानभी, इत्यादी) पात्र व इच्छुक उमेदवारांना खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सक्षम करण्याच्या व शासकीय सेवेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन 2026-27 मध्ये विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत युपीएससी, एमपीएससी, बँकींग (IBPS), पोलीस व सैन्य भरती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांसाठी एकूण 800 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. आरक्षित प्रवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या जागा नियमानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येतील.
सदर प्रशिक्षण उपक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना सर्वंकष धोरणानुसार निश्चित केल्याप्रमाणे योजनानुसार प्रशिक्षण शुल्क, विद्यावेतन अनुज्ञेय आकस्मिक खर्च इत्यादी लाभ देण्यात येणार आहेत. संबंधित योजनेनुसार कालावधी व आर्थिक लाभ वेगवेगळा राहील.
सर्वसाधारण पात्रता : उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील असावा. कुटुबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा अधिक नसावे. अमृतच्या लक्षित गटातील जात नमूद असलेला सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमीत केलेला शासकीय पुरावा उपलब्ध असावा. संबंधित स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता पूर्ण केलेली असावी. संबंधित प्रशिक्षणासाठी इतर कोणत्याही शासकीय/निमशासकीय संस्थेकडून लाभ घेतलेला नसावा.
उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता व संबंधित स्पर्धा परीक्षा देण्याची पात्रता ही योजनानिहाय स्वतंत्रपणे लागू राहील. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित प्रशिक्षण योजनेची सविस्तर माहिती व पात्रता निकष काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महत्वाच्या अटी : एका लाभार्थ्यास एका आर्थिक वर्षात एकाच प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. एका लाभार्थ्यास कमाल दोन वेळा प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. आरक्षित जागांबाबत व निवडीबाबत शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. संबंधित योजनेतील पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच निवड करण्यात येईल.
सन 2026-27 मध्ये विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेस पात्र आणि लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी योजनेचा सविस्तर तपशिल, शासन निर्णय, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतच्या अधिक माहितीकरिता कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ http://trti.maharashtra.gov.in ला भेट देऊन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरुनच ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत. अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनांचे पालन करावे.
सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामायिक प्रवेश परिक्षा (Common Entrance Test – CET) व्दारे गुणांकान पध्दतीने करण्यात घेणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2026 आहे. असे अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी (मो.9112228776) यांनी कळविले आहे.








