गोंदिया : महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत नवगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत सडका अर्जुनी वनपरिक्षेत्रातील मुरटोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या मुरटोली पर्यटन गेटचे आज उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व उद्यम संवर्ग) मा. श्री. रेखेश रंजन, भा.व.से. यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मा. श्रीमती पियुषा जगताप, भा.व.से. उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मा. डॉ. मंगेश गोंदवले यांनी हजेरी लावत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
👉 स्थानिकांना रोजगाराची नवी संधी
नवीन पर्यटन गेटमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
👉 वन्यजीव संवर्धनाला चालना
या माध्यमातून पर्यटकांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती वाढेल, तसेच पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
👉 पर्यटकांचा मोठा प्रतिसाद
कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जंगल सफारीचा आनंद घेत या नव्या उपक्रमाचे स्वागत केले.
मुरटोली पर्यटन गेटच्या उद्घाटनामुळे गोंदिया जिल्हा पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उमटणार असून, स्थानिक विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर समन्वय साधला जाणार आहे.








