अंधाराचा फायदा घेऊन चालक फरार; गोठानपार-वडेकसा जंगलातील घटना.
गोंदिया ( चिचगढ ) : पोलीस ठाणे चिचगड अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान एका संशयास्पद कारचा थरारक पाठलाग करून तब्बल २ लाख ८१ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये अवैध विदेशी दारू आणि कारचा समावेश असून, पोलिसांची चाहूल लागताच चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिचगड पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत रात्र गस्त घालत होते. पहाटेच्या सुमारास एक चारचाकी कार संशयास्पद स्थितीत ककोडीच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा इशारा केला, मात्र चालकाने गाडीचा वेग वाढवला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी फिल्मी स्टाईलने कारचा पाठलाग सुरू केला.
जंगलात कार सोडून चालक फरार
पोलिसांनी पाठलाग चालू ठेवल्याचे पाहून चालकाने कार गोठानपार ते वडेकसा दरम्यान असलेल्या घनदाट जंगल परिसरात नेली. तिथे रस्त्याच्या कडेला वाहन सोडून चालक अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला.
अवैध विदेशी दारूसह २.८१ लाखांचा माल जप्त
पोलिसांनी पळून गेलेल्या कारची पंचांसमक्ष कसून झडती घेतली असता, त्यात अवैध रित्या वाहतूक केली जाणारी ‘GOA’ कंपनीची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांच्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
विदेशी दारू: २३१ बॉटल्स (किंमत अंदाजे ३१,१८५ रुपये)
कार: (क्रमांक CG 08 AJ 8334) (किंमत अंदाजे २,५०,००० रुपये)
एकूण जप्त मुद्देमाल:२,८१,१८५ रुपये
पुढील तपास सुरू:
चिचगड पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कारवाई करणारे ‘ॲक्शन मोड’मधील पथक:
ही धडक कारवाई चिचगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हेगडकर, पोलीस हवालदार (HC) १५३८ राऊत, पोलीस हवालदार (HC) १२२७ मरस्कोल्हे, पोलीस कॉन्स्टेबल (PC) २१५२ झोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल (PC) १६२३ भिसे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.








