गोंदिया : महाराष्ट्र शासन अंतर्गत उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र (नागझिरा खंड) गोंदिया यांच्यामार्फत वनपर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना जंगल पर्यटनादरम्यान राहण्याची सोय सहज उपलब्ध व्हावी यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता कोका व नवेगाव पर्यटन संकुलातील निवास व्यवस्थेचे ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले असून, यामुळे पर्यटकांना आपल्या सहलीचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे
कुठे आणि कशी करता येईल बुकिंग?
प्रशासनतर्फे पर्यटकांसाठी अधिकृत ऑनलाइन पोर्टल safaribooking.mahaforest.gov.in वर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या निवासस्थानांचे विवरण खालीलप्रमाणे आहे:
१. कोका वन्यजीव अभयारण्य पर्यटन संकुल (नागझिरा खंड):
- बांबू हट (कक्ष क्र. १ व २): २ सुट (दर: १८००/- रुपये + जीएसटी अतिरिक्त नियमानुसार)
- वन विश्रामगृह (कक्ष क्र. १): १ सुट (दर: १८००/- रुपये + जीएसटी अतिरिक्त नियमानुसार)
- बांबू हट (कक्ष क्र. ३ व ४): २ सुट (दर: १५००/- रुपये + जीएसटी अतिरिक्त नियमानुसार)
२. नवेगाव राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल (नवेगाव खंड):
- लॉग हट (कक्ष क्र. १ व २): २ सुट (दर: ३५००/- रुपये + जीएसटी अतिरिक्त नियमानुसार)
- लॉग हट (कक्ष क्र. ३): १ सुट (दर: ३०००/- रुपये + जीएसटी अतिरिक्त नियमानुसार)
निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाची ठिकाणे व अंतर:
कोका वन्यजीव अभयारण्य: हे निसर्गप्रेमी व वन्यजीवप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. कोका पर्यटन संकुलापासून जवळचे प्रवेशद्वार चंद्रपूर पर्यटन गेट अवघ्या ५ किमी अंतरावर आहे. तसेच उमरझरी, चोरखमारा व पिटेझरी गेट परिसरही जवळ आहेत. भंडारा शहर येथून कोका अभयारण्य सुमारे २० ते २५ किमी आणि नागपूर शहर/रेल्वेस्थानकापासून अंदाजे ८५ ते ९० किमी अंतरावर आहे.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान: या संकुलाजवळ बकी पर्यटन गेट, खोली पर्यटन गेट, पितांबर टोला गेट व माधवझरी गेट परिसर आहेत. गोंदिया शहरापासून नवेगाव उद्यान साधारण ६५ ते ७० किमी, भंडारा शहरापासून ७० ते ७२ किमी आणि नागपूर शहर/रेल्वेस्थानकापासून अंदाजे १२९ ते १४४ किमी अंतरावर आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्र क्षेत्र प्रशासनाने सर्व निसर्गप्रेमी व पर्यटकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या ऑनलाइन सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि वरील अधिकृत पोर्टलवरून आपल्या खोलीचे बुकिंग करावे.








