सराईत दारू विक्रेत्यांवर ‘खाकी’चा दणका; देसाईगंज, आरमोरीतील ५ गुन्हेगार ४ जिल्ह्यांतून वर्षभरासाठी ‘तडीपार’

गडचिरोली : जिल्ह्यात पूर्ण दारूबंदी असतानाही बेकायदेशीर दारूची विक्री करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने देसाईगंज आणि आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ सराईत दारू विक्रेत्यांना गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांतून १ वर्षासाठी हद्दपार (तडीपार) केले आहे.

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, देसाईगंज (वडसा) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१) (ब) अन्वये हे हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत.

यांच्यावर झाली कारवाई:

  • देसाईगंज पोलीस ठाणे हद्द: रजनी रामचंद्र आत्राम (वय ४९, रा. गांधीवार्ड, देसाईगंज – १५ गुन्हे), नंदाबाई हरिदास शिंगाडे (वय ४८, रा. कुरुड – १५ गुन्हे) आणि संगिता वामन जांभुळकर (वय ५१, रा. विसोरा बर्डी – १४ गुन्हे).
  • आरमोरी पोलीस ठाणे हद्द: ईश्वरदास देविदास खेडेकर (रा. देलनवाडी – ०८ गुन्हे) आणि सुनिल रामचंद्र जिभकाटे (रा. शेगांवटोली – ११ गुन्हे).

सदर आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ सह इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाया करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने आणि त्यांच्या हालचालींमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

आदेश मोडल्यास थेट कोठडी! “जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध व्यावसायिकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील. हद्दपार केलेल्या आरोपींनी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” — एम. रमेश (पोलीस अधीक्षक, गडचिरोली)

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!