जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अंतर्गत आदेश लागू
गोंदिया : आगामी गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासह इतर सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी जिल्ह्यात DJ साऊंड सिस्टीम, प्लाझ्मा साऊंड आणि प्रेशर-मिड साऊंड सिस्टीमच्या वापरावर कायदेशीर निर्बंध व बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्यांवर होणार कारवाई
अतीमोठ्या आणि कर्कश आवाजामुळे मानवी आरोग्याला होणारा धोका, वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले व गरोदर महिलांना होणारा त्रास तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदी व निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
आदेशाची मुख्य वैशिष्ट्ये आणि अटी:
• कालावधी: हा प्रतिबंधात्मक आदेश १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १२:०१ वाजेपासून ते ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री २३:५९ वाजेपर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा क्षेत्रात अंमलात राहील.
• कोणावर लागू? जिल्ह्यातील सर्व DJ चालक, ऑपरेटर, मालक, व्यावसायिक पुरवठादार, रूपांतरित वाहने तसेच सर्व गणेश मंडळे, दुर्गादेवी उत्सव मंडळे व सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांना हे नियम बंधनकारक असतील.
• अपवाद: विहित ध्वनी मर्यादेचे पालन करणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला ही अधिसूचना लागू असणार नाही.
नियम मोडल्यास थेट गाडी व साऊंड सिस्टीम जप्त होणार!
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, DJ मालक किंवा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ (पूर्वीचे IPC १८८), पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ आणि ध्वनी प्रदूषण नियम, २००० नुसार कठोर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसेच नियमबाह्य वापरण्यात येणारी अवैध ध्वनी यंत्रणा आणि वाहने पोलिसांकडून तात्काळ जप्त केली जातील, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.








