Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान होणार असून, त्यासाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
मुंबई : विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीआधीच सहा जागा गमावण्याची नामुष्की महाविकास आघाडीवर ओढवली असून, या जागांवर महायुती बिनविरोध विजयी झाली आहे.
शिवसेना उबाठा पक्षाला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगरच्या अधिकृत उमेदवारांनी चकवा दिला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेना (उबाठा) उमेदवार बाळ माने यांनी रिंगणातून माघार घेतली; तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) उमेदवार देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतला. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश लोखंडे हे ‘उबाठा’ पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.
विधान परिषदेच्या ठाणे आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) उमेदवारांनी गुरुवारी पांढरे निशाण फडकावले. ठाण्याचे उमेदवार अभिजित पवार आणि पुणे मतदारसंघातील उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक, तर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी निवडणुकीतून माघार घेतली. अग्रवाल यांच्या माघारीने भाजपचे उमेदवार अरुण लखानी बिनविरोध निवडून आले आहेत. यवतमाळमध्ये काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी बुधवारीच माघार घेतली होती. अन्य अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यन्त चतुर्वेदी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत.
विधान परिषदेच्या १७ पैकी सहा मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार रिंगणात असल्याने तेथील निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित ११ मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवार असा सामना होईल.
बिनविरोध उमेदवार
रवींद्र फाटक (ठाणे, शिवसेना)
अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस)
विक्रम काकडे (पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस)
दुष्यन्त चतुर्वेदी (यवतमाळ, शिवसेना)
अरुण लखानी (वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, भाजप)
प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर, भाजप)








