मतदारांनो लक्ष द्या! ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरणे बंधनकारक, अन्यथा मतदार यादीतून नाव वगळणार

महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम सुरु झाला असून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने याबाबत महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

सध्या मतदार यादीत नाव असलेल्या सर्व मतदारांनी दि. ०८.०८.२०२६ पर्यंत आपला गणना अर्ज (Enumeration Form) भरून घरोघरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करणे अनिवार्य आहे.

ज्या मतदारांनी गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून दिली आहे, अशाच मतदारांची नावे दि. १७.०८.२०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

ज्यांचे नाव सुटले त्यांनी काय करावे?

ज्या पात्र मतदारांचे नाव चुकून प्रारूप यादीत आले नाही किंवा जे नवीन मतदार आहेत (१८ वर्षे पूर्ण झालेले), त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष संधी दिली आहे.

दि. १७ ऑगस्ट २०२६ ते १६ सप्टेंबर २०२६ या एका महिन्याच्या दावे व हरकतींच्या कालावधीत मतदारांना नमुना 6 (घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह) भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येईल.

नाव समाविष्ट करण्यासाठी / नवीन नोंदणीसाठी – नमुना 6
नावात दुरुस्तीसाठी / पत्ता बदलण्यासाठी – नमुना 8
कोणाचेही चुकीचे नाव वगळण्यासाठी – नमुना 7

मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत घेतली जातील.

खोटी माहिती दिल्यास १ वर्षाची शिक्षा

मतदार यादीत नाव समाविष्ट करताना किंवा वगळताना कोणीही चुकीचे घोषणापत्र / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्तीस 1 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असा इशाराही कार्यालयाने दिला आहे.

दरम्यान, राज्याची अंतिम मतदार यादी दि. १९.१०.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदारांना आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम 22 व 23 नुसार ही सुधारणा प्रक्रिया ही निरंतर अद्यतन प्रक्रिया (Continuous Updation) असून कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत अर्ज करता येतो, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी केले आहे.


SIR मोहिमेचे वेळापत्रक एका नजरेत
गणना अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ८ ऑगस्ट २०२६
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: १७ ऑगस्ट २०२६
दावे-हरकतींचा कालावधी: १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: १९ ऑक्टोबर २०२६

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!