गोंदिया ( सालेकसा ) : सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावली येथून उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB), गोंदिया यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीची बॅटरी विकणाऱ्या दोन सराईत चोरट्यांसह ती खरेदी करणाऱ्या एका कबाडी दुकानदाराला अटक केली असून त्यांच्याकडून एकूण ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावली येथील काळे (सलोनी) पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ३ ट्रक आणि १ ट्रॅक्टरमधून अज्ञात चोरट्यांनी ०२ ऑगस्ट ते ०३ ऑगस्ट दरम्यान रात्रीच्या वेळी सुमारे ७ बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी फिर्यादी कॉमेन्द्र खेमराज मेंढे (रा. डोंगरगाव) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे व एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास चक्र तीव्र केली. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छोटा गोंदिया येथील आतिष शंकर रहांगडाले (३१) आणि ऋत्विक बस्तीराम कंटकार (२५) या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.
कबाडी दुकानातून बॅटऱ्या जप्त
पोलिसांनी खाकीचा दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. भाड्याची चारचाकी गाडी स्वतः चालवत आणून ही चोरी केल्याचे आणि सर्व ७ बॅटऱ्या प्रिन्स चौक, फुलचूर येथील कबाडी व्यावसायिक कैलास संजय चौधरी (३५) याला विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कबाडी दुकानात छापा मारून अमरॉन, पावरजोन आणि एस. एफ. कंपनीच्या एकूण ७ बॅटऱ्या (किंमत ₹३७,०००/-) जप्त केल्या.
तीन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी सालेकसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस अंमलदार सुबोधकुमार बिसेन, विठ्ठल ठाकरे, दिक्षितकुमार दमाहे, संजय चौहान, हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले व राम खंदारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.








