तडसगाव प्लांटवर 15-20 हजार ब्रास अवैध रेतीचा साठा, चौकशीची मागणी
गोंदिया ( अर्जुनी मोरगांव ) : अर्जुनी/मोरगाव ते लाखांदूर या रस्त्याच्या बांधकामात अग्रवाल ग्लोबल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करत मोहसीन अन्सारी, रा. देवरी यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. दिनांक 10/08/2026 रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर रस्त्याच्या बांधकामासाठी तडसगाव येथील कंपनीच्या प्लांटवर अंदाजे 15 ते 20 हजार ब्रास अवैध रेती विनापरवाना जमा करून ठेवण्यात आली आहे. या रेतीसाठी कोणतीही शासकीय रॉयल्टी भरलेली नाही. त्यामुळे शासनाच्या महसूलाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाचीही हानी होत आहे.
20 दिवसांपासून कारवाई नाही
तक्रारकर्ते अन्सारी यांनी यापूर्वी दिनांक 20/07/2026 रोजी मा. तहसीलदार, मोरगाव/अर्जुनी यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यात 7 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याची मागणी केली होती. मात्र आज 20 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कंपनीचे मनोबल वाढले असून अवैध कामे सुरूच आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे 4 मागण्या
सदर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या विनंतीत अन्सारी यांनी 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत.
- प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गौण खनिज उत्खन नियमांनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी.
- तडसगाव येथील प्लांटवरील अवैध रेतीसाठ्याचा तात्काळ पंचनामा करून जप्तीची कारवाई करावी.
- रस्ता बांधकामात वापरल्या जाणाऱ्या रेतीच्या रॉयल्टी पावत्यांची तपासणी करावी.
- केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 7 दिवसाच्या आत तक्रारकर्त्याला द्यावा.
या प्रकरणामुळे शासनाचा महसूल बुडत असताना संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे, हे अत्यंत गंभीर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.








