“सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो” थीम; पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा
महाराष्ट्र : शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने येत्या २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये “महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर” (Maha Walkathon – Walk for Water) या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान “जलसंधारण सप्ताह” आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ दरम्यान “जलसंधारण अभियान” राबविले जाणार आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी हा महा वॉकेथॉन होत आहे.
या उपक्रमाची थीम ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य आहे. कार्यक्रमाचे स्वरूप किमान ३ किलोमीटर चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे असणार आहे.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे प्रमुख असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, खासदार, आमदार, सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व महापौर/उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य व इतर सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे.
यासोबतच सर्व प्रशासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, रनिंग क्लब, सायकलिंग क्लब, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, व्यायाम शाळा, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
क्यूआर आधारित नोंदणी आणि प्रमाणपत्र
महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे, तर प्रथम दहा विजेत्यांना जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहनही शासनाने केले आहे.







