चिचगड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; 14 वर्षांपासून प्रलंबित सामूहिक वनहक्क फेरफार प्रकरणे निकाली काढून सातबारा उताऱ्यांचे वितरण

गोंदिया : अपर तहसिल कार्यालय, चिचगड येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.
         ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री. कातकडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, शिक्षण, लोकसहभाग आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणात प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.
          या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामपंचायतींच्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फेरफार प्रकरणांचा निपटारा करून संबंधित ग्रामपंचायतींना सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. संबंधित ग्रामपंचायतींना सामूहिक वनहक्काचे पट्टे यापूर्वीच प्राप्त झाले होते; तथापि, फेरफार प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सातबारा उतारे उपलब्ध झाले नव्हते. तहसील कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांतून प्रलंबित फेरफार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायतींना सातबारा उतारे प्रदान करण्यात आले. त्यामुळे वनहक्कधारक ग्रामपंचायतींच्या हक्कांची महसुली नोंद अधिकृतरीत्या पूर्ण झाली.
          सातबारा उताऱ्यांचे वितरण झाल्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी तहसीलदार नवनाथ कातकडे व तहसील प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
          या कार्यक्रमात श्रीराम विद्यालय चिचगड येथील सुमारे 700 विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे कार्यक्रमात रंगत आणली.
          समारंभास नायब तहसीलदार संतोष मांडवे, श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य श्री. देशमुख, श्री. गिरी, शिक्षकवृंद, महिला कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, मंडळ अधिकारी पुनमचंद हुमणे व सुवर्णा लंजे, ग्राम महसूल अधिकारी राहुल काकडे, नितीन मदने, विकास मुंढरे, देवेंद्र खापर्डे, पूनम गायधने, चंद्रशेखर तुमसरे, विनोद कोरे, गीतांजली बारसागडे, सागर गौरकार, नितीलेश दंडाले, लोकेश धरमगुडे, महसूल सहायक राहुल चोपकर, राजू रहांगडाले, शिपाई दिलीप गायधने, वाहनचालक प्रफुल मदनकर, प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार, महसूल सेवक तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          कार्यक्रमादरम्यान महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला तसेच त्यांना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अधिक चांगल्या कार्यासाठी प्रेरणा निर्माण झाली.
          पोलीस विभागाच्या चमुने ध्वजारोहण समारंभाच्या अनुषंगाने आवश्यक ती बंदोबस्त व्यवस्था व शिस्तबद्ध कार्यवाही करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
         कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक मूल्यांचे जतन आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सक्रिय सहकार्य करण्याचा संकल्प केला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!