गोंदिया (विशेष बातमीदार) : गोंदिया जिल्हा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) तब्बल १० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या दोन बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली.
१. दहावीत नापास झाल्याच्या भितीने घर सोडलेला ‘सुरेंद्र’ अखेर मुंबईत सापडला
गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षीय सुरेंद्र (काल्पनिक नाव) मार्च २०१३ मध्ये १० वीच्या परीक्षेत गणित व इंग्रजी विषयात नापास झाला होता. अपयशाच्या भीतीने आणि लोकांच्या टोमण्यांना कंटाळून त्याने घर सोडले व मुंबई गाठली. तिथे एका फूड प्लाझा व कँटीनमध्ये काम करून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता.
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून AHTU च्या पथकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) परिसर गाठून सुरेंद्रचा शोध घेतला. १० वर्षांनंतर मुलगा सुखरूप समोर उभा ठाकलेला पाहून त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
२. मध्य प्रदेशात संसार थाटलेली ‘दुर्गा’ १० वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात
सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २०१४ मध्ये इयत्ता ९ वीत शिकणारी १३ वर्षीय दुर्गा (काल्पनिक नाव) अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
AHTU च्या पथकाने सुरत, हैदराबाद, कोलकाता, रांची, पुणे, मुंबई, नागपूर, अकोला अशा अनेक ठिकाणी शोध घेतला. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे दुर्गा मध्य प्रदेशातील एका गावात नाव बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तेथे छापा टाकून ३ मुलांची आई बनलेल्या दुर्गाचा शोध लावला.
कौतुकास्पद कामगिरी
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU चे प्रभारी अधिकारी म.स.पो.नि. मनीषा निकम, पो.उप.नि. नामदेव बनकर, स.फौ. जितेन्द्र मिश्रा, पो.हवा. बलराज लांजेवार, म.पो.हवा. शारदा मोर्य, गीता गि-हेपुंजे, शिल्पा वडवाईक, म.पो.शि. विना कुकडे, मंजू वागडे, पो.शि. रविंद्रकुमार मेश्राम व चालक म.पो.शि. सुरेखा शेंडे यांनी केली आहे.








