गोंदिया ( देवरी तालुका ) : देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत गोटाबोडी अंतर्गत विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी गोटाबोडी येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) निवेदनाद्वारे केली आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायत गोटाबोडी अंतर्गत विविध शासकीय योजनांमधून विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, या कामांच्या खर्चाबाबत आणि निधीच्या वापराबद्दल गावकऱ्यांच्या मनात गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.
निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख मागण्या व मुद्दे:
• धोबीसराड येथील कामांची चौकशी: आदर्श ग्राम योजनेअंतर्गत धोबीसराड येथे झालेल्या सर्व कामांची व त्यावर झालेल्या संपूर्ण खर्चाची चौकशी करण्यात यावी.
• नवीन बोअरवेल खर्च: गोटाबोडी येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या नवीन बोअरवेलच्या कामाची चौकशी व्हावी.
• पेंटिंग साहित्य खरेदी: ग्रामपंचायत इमारतीच्या पेंटिंगसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या खर्चाची चौकशी केली जावी.
• नाली सफाईतील गैरव्यवहार: आर्थिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीत ‘भागी’ येथे करण्यात आलेल्या नाली सफाई कामांवर झालेला खर्च संशयास्पद असून, ग्रामपंचायत सदस्यांनाही विश्वासात न घेता भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
कागदपत्रांची तपासणी व प्रत्यक्ष पाहणीची मागणी
या सर्व कामांच्या चौकशीदरम्यान संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव, मंजुरी पत्र, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB Book), बिले व व्हाउचर्स या सर्व कागदपत्रांची कडक तपासणी व्हावी, तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चौकशीअंती निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार आढळल्यास दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका गोटाबोडी येथील गावकऱ्यांनी घेतली आहे.







