गोंदिया : गोंदिया जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२६ पासून १५ दिवसांसाठी मनाई आदेश (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
२१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध
हा मनाई आदेश दि. २१ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री (१२:०१ वाजेपासून) ते दि. ५ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री १२.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. आगामी काळात विविध संघटनांचे मोर्चा, धरणे, उपोषण व ‘रास्ता रोको’ यांसारखी आंदोलने प्रस्तावित आहेत. तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव व इतर सण-उत्सव असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आदेशानुसार ‘या’ गोष्टींवर असणार पूर्ण बंदी:
१. शस्त्रे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या-काठ्या किंवा दुखापत घडवून आणेल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगणे.
२. ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे.
३. दगड, क्षेपणास्त्रासारखी फेकावयाची साधने जमा करणे किंवा बाळगणे.
४. कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमा किंवा पुतळ्यांचे दहन व प्रदर्शन करणे.
५. सार्वजनिक ठिकाणी चिथावणीखोर घोषणा देणे, प्रक्षोभक गाणी म्हणणे.
६. समाजस्वास्थ्य, नीतिमत्ता व राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करतील अशी भाषणे देणे, हावभाव करणे किंवा फलक/चित्रे प्रसिद्ध करणे.
७. उपविभागीय दंडाधिकारी (SDM) किंवा स्थानिक ठाणेदारांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक अथवा मोर्चा काढणे.
‘यांना’ नियमातून सूट:
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना हा आदेश लागू नसेल. याशिवाय अंत्ययात्रा/प्रेतयात्रा आणि पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांच्या मिरवणिकांना या मनाई आदेशातून वगळण्यात आले आहे.
उल्लंघन केल्यास थेट कारवाई!
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच विशेष प्रकरणात सूट देण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना (SDM) पोलीस अहवालाच्या आधारे देण्यात आले आहेत.








