प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या स्थितीचा आढावा
भंडारा : ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी सुलभ करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तेथील त्रुटी व कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीषा साकोडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अजिंक्य अंबाडकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच मोठ्या संख्येने असलेल्या उपकेंद्रांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रांमधील उपलब्ध सोयी-सुविधा, आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, पायाभूत सुविधा तसेच आवश्यक सुधारणांची माहिती प्रत्यक्ष पाहणीद्वारे संकलित करण्यात येणार आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या त्रुटी व कमतरतांची अचूक माहिती संकलित करून ती जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय समित्यांच्या अध्यक्षांसोबत संबंधित आरोग्य केंद्रांची पाहणी करून आवश्यक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.
विधानसभा व जिल्हास्तरीय समित्यांमार्फत कार्यवाही
शासनाच्या धोरणानुसार विधानसभास्तरीय तसेच जिल्हास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेचे कामकाज अधिक पारदर्शक, प्रभावी आणि नागरिकांसाठी सुलभ पद्धतीने व्हावे, हा समित्यांच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.
विधानसभास्तरीय समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचना, समस्या तसेच पाहणीदरम्यान प्राप्त झालेले निष्कर्ष यांचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे आरोग्य सुविधांमधील कमतरता दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करण्यात येतील.
तळागाळातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर शासनाचा भर असून, त्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.








