गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुमसरमधील अट्टल गुंड ‘डिकरा’ नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी; एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

भंडारा ( तुमसर ) : गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भंडारा जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तुमसर परिसरातील खतरनाक व अट्टल गुंड आकाश उर्फ डिकरा रमेश महालगावे (वय ३० वर्ष, रा. अभ्यंकर नगर, तुमसर) याच्यावर ‘एम.पी.डी.ए.’ (MPDA) कायद्यान्वये कारवाई करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
२०२० पासून गुन्हेगारीत सक्रिय
आकाश उर्फ डिकरा हा सन २०२० पासुन सातत्याने गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय होता. त्याच्याविरोधात तुमसर, गोबरवाही, भंडारा आणि लाखनी पोलीस ठाण्यात खून, दुखापत करणे, सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे, शिवीगाळ करणे, अग्निशस्त्रे व प्राणघातक शस्त्रास्त्रे बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरवणे अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या हिंसक व गुन्हेगारी वृत्तीमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानबद्धतेचे आदेश
गणेशोत्सवाच्या काळात शांतता भंग होऊ नये आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस प्रशासनाने त्याच्याविरुद्ध ‘एम.पी.डी.ए.’ कायद्यानुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सावन कुमार यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी या प्रस्तावाला मंजुरी देत आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.
पोलीस प्रशासनाची धडक कारवाई
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (तुमसर) श्री. शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम व स्थानिक गुन्हे शाखा आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अशा प्रकारच्या समाजविघातक व धोकादायक गुंडांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!