देवरी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ६ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

देवरी : अवैध वाळू (रेती) वाहतूक करणाऱ्यांविरोधात देवरी पोलिसांनी कठोर पावले उचलत धडक कारवाई केली आहे. डोंगरगाव ते सालेधारणा मार्गावर विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी ट्रॅक्टरसह ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाचे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक (कॅम्प देवरी) श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे ठाणेदार श्री. गणेश कृष्णा वनारे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, डोंगरगाव ते सालेधारणा रस्त्याने एका ट्रॅक्टरद्वारे अवैधपणे रेतीची वाहतूक केली जात आहे.
माहिती मिळताच ठाणेदार यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यातील पोलीस हवादार ग्यानीराम करंजेकर, पंकज पारधी, पोलीस नाईक रामराव कांदे, पोलीस शिपाई देवेंद्र नेताम तसेच उपविभागीय पोलीस कार्यालय देवरी येथील पोहवा रविन्द्र दहिफळे व पोना संतोष समरीत यांच्या संयुक्त पथकाने डोंगरगाव येथे सापळा रचला. डोंगरगाव कडून सालेधारणा कडे जात असलेला ट्रॅक्टर (क्रमांक MH-35-AG-5638) अडवून त्याची पाहणी करण्यात आली.
तपासादरम्यान ट्रॅक्टर चालकाने आपले नाव भुनेश्वर मेघराज पाठणकर (वय ३१ वर्ष, रा. डोंगरगाव, ता. सडक अर्जुनी) असे सांगितले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पाहणी केली असता त्यात सुमारे ६,००० रुपये किमतीची १ ब्रास रेती आणि ६,०००,००० रुपये किमतीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह असा एकूण ६,०६,००० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अवैधपणे रेती वाहतूक करणाऱ्या आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५ (ई) अंतर्गत अपराध क्रमांक ३५९/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणेदार श्री. गणेश कृष्णा वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामराव कांदे (पोलीस स्टेशन देवरी) पुढील तपास करीत आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!