गोंदिया (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैधरित्या गांजा व एम.डी. ड्रग्जची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून कामठीवरून गोंदियाकडे कारने एम.डी. (Mephedrone) ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २३.२५ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, स्विफ्ट डिझायर कार आणि मोबाईल असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आकाश दिलीप मेश्राम (वय ४९, रा. सावित्रीबाई फुले वॉर्ड, गोंदिया) आणि रिजवान इकबाल शेख (वय ३७, रा. रामनगर, बाजार चौक, गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कारवाईचा सविस्तर तपशील:
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, आकाश मेश्राम हा त्याच्या साथीदारासह कामठी (नागपूर) येथून स्विफ्ट डिझायर कारने अमली पदार्थ घेऊन चुटिया रोडने गोंदियाकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे १४ ऑगस्टच्या सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास चिचटोला ते चुटिया मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली.
संशयित पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार येताच पोलिसांनी तिला थांबवून पंचांसमक्ष गाडीतील दोघांची अंगझडती घेतली. तपासादरम्यान त्यांच्याकडे पारदर्शक प्लास्टिक झिप्पर पाऊचमध्ये ४,६५,००० रुपये किमतीचे २३.२५ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी तत्काळ ड्रग्जसह तस्करीत वापरलेली ५ लाख रुपयांची कार आणि ३५ हजार रुपयांचे दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई:
पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अभिषेक जंगमवार, सहायक फौजदार राजू मिश्रा, पोलीस अंमलदार महेश मेहर, तुळशीदास लुटे, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, राकेश इंदूरकर, सुनील डहाके, चालक राम खंडारे व निलेश ठाकरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.







