गोंदिया : जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवकाने निवृत्त कर्मचाऱ्याच्या नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे थकीत एरिअस बिल काढून देण्यासाठी ७,००० रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (दि. २४) यशस्वी सापळा रचून आरोग्य सेवक आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला रंगेहात ताब्यात घेतले.
घटनेची पार्श्वभूमी:
तक्रारदाराचे वडील हे जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सेवक म्हणून २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले होते व फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांचे निधन झाले. तक्रारदार हे आईच्या कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत चौकशीसाठी मार्च २०२६ मध्ये कार्यालयात गेले असता, वरिष्ठ लिपिक नीरजकुमार अग्रवाल यांनी वडिलांच्या नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे थकीत बिल काढून देण्याच्या मोबदल्यात ६,००० रुपयांची मागणी केली.
त्यानंतर जून २०२६ मध्ये पुन्हा चौकशी केली असता अग्रवाल यांनी तक्रारदारास आरोग्य सेवक मारुती दिपेवाड यांना भेटण्यास सांगितले. दिपेवाड यांनी बिल मंजूर करण्यासाठी ७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. २१ ऑगस्ट रोजी दिपेवाड यांनी लाचेच्या रकमेचा तगादा लावल्याने, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २४ ऑगस्ट रोजी एसीबी गोंदिया कार्यालयात अधिकृत तक्रार नोंदवली.
सापळा आणि कारवाई:
तक्रारीच्या आधारे २४ ऑगस्ट रोजीच लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी मारुती दिपेवाड यांनी ७,००० रुपये लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली, तर आरोपी नीरजकुमार अग्रवाल यांनी या कामासाठी प्रोत्साहन दिले.
त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी मारुती दिपेवाड यांना तक्रारदाराकडून ७,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले वरिष्ठ लिपिक नीरजकुमार अग्रवाल यांनाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटकेची कारवाई करण्यात येत आहे.
कारवाई करणारे पथक:
ही धडक कारवाई एसीबी नागपूरच्या पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंदिया एसीबीचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, उमाकांत उगले आणि अंमलदार करपे, बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले व डांगे यांच्या पथकाने केली.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया (तिरोडा रिंग रोड, रेल्वे गेट जवळ, दूरध्वनी: ०७१८२-२५१२०३ / ९२०९०४१०६४) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.








