गोंदिया ( देवरी ) : देवरी शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी देवरी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDM), देवरी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले
शहर व ग्रामीण भागात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्रशासनाने या समस्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष कुलदीप एस. गुप्ता यांनी दिला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
• EPIC नोंदणी: मतदारांना मतदार ओळखपत्राबाबत (EPIC) येणाऱ्या अडचणी दूर करून पात्र नागरिकांची नोंदणी सुलभ करण्यात यावी.
• स्मार्ट मीटरला विरोध: स्मार्ट मीटर बसविण्याला नागरिकांचा तीव्र विरोध असून, स्मार्ट मीटरची सक्ती करू नये व तक्रारींची दखल घ्यावी.
• शुद्ध पाणीपुरवठा: देवरी शहर व तालुक्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा.
• रस्त्यांची दुरुस्ती: तालुक्यातील दराड झालेल्या प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात यावे.
• स्वच्छता व्यवस्था: वाढत्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी नियमित साफसफाई, कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबवावी.
• वीजपुरवठा व लोडिंग: वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व नागरिक हैराण झाले असून, सुरळीत व नियमित वीजपुरवठा करावा.
• साखरेच्या दरावर नियंत्रण: साखरेच्या वाढत्या दरांचा सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होत असल्याने वाढत्या महागाईवर व दरांवर सरकारने नियंत्रण ठेवावे.
या सर्व समस्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने प्रशासनाने संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









