गणेशोत्सवात डि.जे., लेझर लाईटवर कडक बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई: गोंदिया पोलीस अधीक्षक यांचे निर्देश

गोंदिया : आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि नियमांचे पालन करून पार पडावा, यासाठी गोंदिया पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. १२ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय गोंदिया येथील प्रेरणा हॉलमध्ये पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील डी.जे. चालक व मालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी आणि जिल्ह्यातील १०० हून अधिक डि.जे. मालक-चालक उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात डी.जे.च्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलिसांनी दिले आहेत.
बैठकीतील प्रमुख सूचना व पोलीस निर्देश:
लेझर व मिक्सर लाईटवर पूर्ण बंदी: गणेशोत्सवातील रॅली आणि मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट, मिड मिक्सर व मिक्सर लाईटचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
ध्वनी मर्यादेचे कडक पालन: ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डि.जे. वाजवल्यास संबंधित गणेश मंडळ आणि डि.जे. मालकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
अवैध डि.जे. वाहनांवर कारवाई: डी.जे. वाहनांच्या दोन्ही बाजूंना अतिरिक्त पॅनल जोडल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. उपप्रादेशिक परिवहन विभाग (RTO) गोंदिया यांच्या समन्वयाने अशा वाहनांची तपासणी करून कडक कारवाई केली जाईल.
शांततेत विसर्जन: विसर्जन मिरवणूक आणि मूर्ती विसर्जन सर्व नियमांचे पालन करून अत्यंत शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी उपस्थितांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सण आनंदात व शिस्तीत साजरा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!