गोंदिया (विशेष प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीत, अत्यंत शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावा, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी मा. श्री. मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भैय्यासाहेब बेहरे, अपर तहसीलदार श्री. श्रीकांत कांबळे, पोलीस उप-अधीक्षक (गृह), उपविभागीय पोलीस अधिकारी (गोंदिया, आमगाव, तिरोडा), सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व प्रशासनाचे निर्देश:
• पर्यावरण संवर्धन व मिरवणूक काळजी: उत्सव काळात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच मूर्ती मिरवणूक व विसर्जन दरम्यान सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
• लेझर लाईट व मिक्सर लाईटवर बंदी: पोलीस महासंचालकांसोबत झालेल्या व्हीसीमधील निर्देशांनुसार, गणेश उत्सव रॅली किंवा विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट, मिड मिक्सर व मिक्सर लाईटचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल.
• ध्वनी मर्यादा व रहदारीची दक्षता: विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे (डी.जे. आवाज) कडक पालन करावे. तसेच मंडळांच्या पेंडॉलमुळे रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले.
• गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई: उत्सव काळात शांतता भंग होऊ नये म्हणून पोलीस विभागामार्फत असामाजिक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
• स्थानिक स्तरावर बैठका: पोलीस स्टेशन स्तरावर गणेशोत्सव मंडळ व डी.जे. मालकांची बैठक घेऊन आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीदरम्यान उपस्थित शांतता समिती सदस्य व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनातर्फे योग्य त्या सूचना देण्यात आल्या. नागरिक व गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








