अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरपूर येथील तरुणाला अटक… 

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पो. उपनि. मिलिंद गेडाम तपास करीत आहेत…

गोंदिया ( देवरी ) :- शिरपूर येथे एका 34 वर्षीय तरुणाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला बहाण्याने घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरी पोलिसांनी आरोपी संतोष झाडूजी पंधरे, वय 34, रा. शिरपूर, ता. देवरी याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना दि. 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास मौजा शिरपूर येथे घडली. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घराबाहेर मैत्रिणीसोबत खेळत असताना आरोपी संतोष पंधरे याने तिला साबण आणण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्याने मुलीला दुकानातून साबण आणायला पाठवले. मुलगी साबण घेऊन आरोपीच्या घरी परत आल्यानंतर आरोपीने तिला हाताला मलम लावण्यास सांगितले.
मुलगी मलम लावत असताना आरोपीने तिचे दोन्ही हात पकडून तिला बिछान्यावर पाडले व तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच पैसे देण्याचे आमिष दाखवून याबाबत कोणालाही सांगू नकोस, अशा बोललं. घाबरलेल्या अवस्थेत मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
फिर्यादी पालकांनी तत्काळ देवरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संतोष पंधरे याच्याविरुद्ध कलम 74 भारतीय न्याय संहिता सहकलम 8, 12 लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोस्को) 2012 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे शिरपूर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें