१५ ‘म्युल बँक खातेदारांवर’ गुन्हे दाखल; पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
गोंदिया: देशात सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, गोंदिया जिल्हा पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या बँक खात्यांवर मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १५ ‘म्युल बँक खातेधारकांविरुद्ध’ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल व सर्व पोलीस ठाण्यांमार्फत ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
काय आहेत ‘म्युल बँक खाती’?
सायबर फसवणूक करणारे गुन्हेगार स्वतःचे बँक खाते न वापरता, फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी किंवा ती दुसऱ्या खात्यात वळवण्यासाठी इतरांच्या बँक खात्यांचा (ज्याला ‘म्युल खाते’ म्हटले जाते) वापर करतात. हे गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना पैसे, फंड, जीएसटी किंवा सिबील (CIBIL) स्कोअर वाढवून देण्याचे, तसेच लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. काही वेळा नातेवाईक आजारी असल्याचे व बँकेची मर्यादा संपल्याचे खोटे सांगून, तर काही वेळा कमिशनचे आमिष दाखवून लोकांची बँक खाती फसवणुकीसाठी वापरतात.
गुन्हेगार अनेकांकडून खोटे बोलून किंवा आमिष दाखवून त्यांचे बँक किट (ज्यामध्ये बँक खाते, युझर आयडी, पासवर्ड, सिमकार्ड, चेकबुक आणि एटीएम पासवर्ड यांचा समावेश असतो) खरेदी करतात. या खात्यांवर फसवणुकीची मोठी रक्कम मागवली जाते आणि एटीएम किंवा चेकबुकद्वारे ती काढून घेतली जाते.
एनसीसीआरपी पोर्टलद्वारे कारवाई :
भारतीय सायबर गुन्हे केंद्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीसीआरपी (NCCRP) पोर्टल आणि समन्वय पोर्टलद्वारे प्राप्त तक्रारींचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार गोंदिया पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत अशा बँक खात्यांचा शोध लावला असून, आतापर्यंत १५ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन :
गोंदिया जिल्हा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून खालील गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
• कोणत्याही आमिषाला बळी पडून अनोळखी व्यक्तीला किंवा ऑनलाईन माध्यमातून आपले बँक खाते, सिमकार्ड, एटीएम, पासवर्ड किंवा चेकबुक पैशांच्या व्यवहारासाठी देऊ नये.
• सायबर फसवणुकीबाबत कोणताही संशय आल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
• नागरिक www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशन गोंदिया येथे आपली तक्रार नोंदवू शकतात.








